
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) योजनांमधून मुंबईतील लाखो कुटुंबांना नवीन इमारतींमध्ये घरे मिळाली आहेत. ही घरे मोफत किंवा नाममात्र किमतीत, कुटुंबाने स्वतः तिथे राहावे या अटीवर दिली जातात. म्हणूनच वाटपानंतर काही काळ ही सदनिका विकण्यावर कायद्याने बंदी आहे. 2024 मध्ये हा कालावधी कमी झाला, आणि आता अनेक कुटुंबे विचारतात की सदनिका विकता येईल का आणि कशी.
महत्त्वाचे मुद्दे
- लॉक-इन कालावधी
- 5 वर्षे (2024 मध्ये 10 वर्षांवरून कमी)
- कायदा
- महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 चे कलम 3E
- लॉक-इनमध्ये
- विक्री, बक्षीस, भाडेपट्टा किंवा “अन्य प्रकारे” हस्तांतरणास मनाई
- लॉक-इननंतर
- SRA ची परवानगी घेऊन विक्री
- नियमभंग केल्यास
- कलम 3E(2) नुसार कारवाई, ज्यात बेदखलीही होऊ शकते
2024 मध्ये काय बदलले
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 च्या कलम 3E नुसार पुनर्वसन सदनिका मिळालेल्या व्यक्तीला ठराविक काळ ती हस्तांतरित करता येत नाही. हा काळ दहा वर्षे होता. 2023 च्या सुधारणा विधेयकाने तो पाच वर्षे केला, आणि तो 19 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या सन 2024 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. XV द्वारे कायदा झाला.
नियम एका नजरेत
| प्रश्न | स्थिती |
|---|---|
| लॉक-इन कालावधी | 5 वर्षे (2024 मध्ये 10 वर्षांवरून कमी). हा कालावधी कोणत्या तारखेपासून मोजायचा ते तुमच्या वाटपपत्रात पाहा |
| लॉक-इनदरम्यान हस्तांतरण | विक्री, बक्षीस, भाडेपट्टा किंवा “अन्य प्रकारे”, कोणत्याही प्रकारे मनाई |
| लॉक-इननंतर हस्तांतरण | SRA च्या सध्याच्या प्रक्रियेनुसार SRA ची परवानगी आवश्यक |
| मनाई असताना हस्तांतरण केल्यास | कलम 3E(2) नुसार कारवाई, ज्यात बेदखलीही होऊ शकते |
“करारनामा” आणि मुखत्यारपत्राचे व्यवहार धोकादायक का
लॉक-इनच्या काळात अनेकदा सदनिका नोटरी केलेल्या करारनाम्याने, मुखत्यारपत्राने (पॉवर ऑफ अॅटर्नी) किंवा फक्त ताबा देऊन, “नंतर नोंदणी करू” असे सांगून “विकल्या” जातात. असे व्यवहार दोन्ही बाजूंसाठी धोकादायक आहेत:
- हस्तांतरणालाच मनाई असल्याने खरेदीदाराला मान्यताप्राप्त मालकी मिळत नाही;
- मूळ वाटपधारकाला बेदखल करून सदनिका परत घेतली जाऊ शकते; आणि
- खरेदीदाराचे घर आणि पैसे दोन्ही जाऊ शकतात.
छाया काशिनाथ शिंदे विरुद्ध महाराष्ट्र राज्य (रिट याचिका क्र. 9247/2016, निकाल 31 जुलै 2026 रोजी अपलोड) या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी कलम 3E मधील “अन्य प्रकारे” या शब्दांचा व्यापक अर्थ लावला. नोंदणीकृत विक्रीखत किंवा भाडेपट्टा नाही, एवढ्याने मनाईतून सुटका होत नाही. वाटपधारकाने मुखत्यारपत्र करून ताबा दिला होता आणि नंतर सदनिकेत भाडेकरू राहत असल्याचे आढळले; SRA चा बेदखलीचा आदेश कायम ठेवण्यात आला. मात्र हस्तांतरण झाले हे अधिकाऱ्यांना सिद्ध करावे लागते, केवळ गृहीत धरणे पुरेसे नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लॉक-इन संपल्यानंतर विक्री
- लॉक-इन संपला आहे याची खात्री करा, वाटप आणि ताबा कागदपत्रांवरून.
- थकबाकी भरा: सोसायटी, वीज, पाणी इत्यादी.
- हस्तांतरणासाठी SRA कडे परवानगी अर्ज करा, SRA मागेल ती कागदपत्रे जोडा आणि लागू शुल्क भरा.
- दुय्यम निबंधक कार्यालयात विक्रीखत नोंदवा आणि मुद्रांक शुल्क भरा.
- सोसायटी सदस्यत्व: सोसायटी शेअर सर्टिफिकेट खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित करते.
खरेदीदारासाठी तपासणी यादी
- SRA वाटपपत्र आणि ताबा मिळाल्याची तारीख.
- हस्तांतरणासाठी SRA ची परवानगी.
- सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि थकबाकी नसल्याचे पत्र.
- इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र (OC).
- वाटपधारक आणि वाटपात नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळखपत्रे.
- सदनिका आधी हस्तांतरित झाली असल्यास सूची क्र. II आणि आधीच्या व्यवहारांचे दस्त.
यापैकी काहीही नसल्यास सल्ला घेतल्याशिवाय टोकन रक्कमही देऊ नका.
पुनर्वसन सदनिकेसाठी पात्रता: 2000 आणि 2011 च्या तारखा
या तारखा पुनर्वसन सदनिका कोणाला मिळते याच्याशी संबंधित आहेत, सदनिका कधी विकता येते याच्याशी नाही. योजनेनुसार 1 जानेवारी 2000 पर्यंत वास्तव्याचा पुरावा असलेले झोपडीधारक मोफत पुनर्वसनासाठी पात्र आहेत. 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यानच्यांना 2018 ची सुधारणा आणि 2023 च्या शासन निर्णयानुसार (नोंदवलेली रक्कम ₹2.5 लाख) सशुल्क सदनिका मिळू शकते. पात्रतेबद्दलचे वाद कायद्यानुसार सक्षम प्राधिकारी आणि अपील प्राधिकाऱ्याकडे जातात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मला 2018 मध्ये SRA सदनिका मिळाली. आता विकता येईल का?
पाच वर्षांचा कालावधी संपला असेल तर SRA च्या परवानगीने विक्री शक्य आहे. आधी तारखा आणि SRA ची सध्याची प्रक्रिया तपासा.
लॉक-इनच्या काळात SRA सदनिका भाड्याने देता येईल का?
भाडेपट्टा किंवा लिव्ह अँड लायसन्ससुद्धा मनाई असलेले हस्तांतरण मानले जाऊ शकते. स्थिती तपासल्याशिवाय लॉक-इनच्या काळात सदनिका भाड्याने देऊ नका.
वडिलांचे निधन झाले. सदनिका आमच्या नावे होऊ शकते का?
मृत्यूनंतर कायदेशीर वारसांच्या नावे हस्तांतरणाची SRA आणि सोसायटीकडे वेगळी प्रक्रिया आहे. लॉक-इनचा उद्देश विक्री थांबवणे आहे, वारसा नाही; तरीही वारसांनी हस्तांतरण योग्य प्रकारे नोंदवून घेतले पाहिजे.
हेही वाचा: सदस्याच्या मृत्यूनंतर सोसायटी सदनिका हस्तांतरण आणि हक्कसोड पत्र.
स्रोत
- महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 – India Code
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई – अधिकृत संकेतस्थळ
सल्ला भेटीसाठी पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. वेळ ठरवण्यासाठी +91 99301 50560 वर फोन करा किंवा WhatsApp संदेश पाठवा.
हे मार्गदर्शक 2024 च्या सुधारणेनंतर, नोव्हेंबर 2026 मधील कायदेशीर स्थिती सांगते. SRA ची प्रक्रिया आणि शुल्क बदलू शकतात; कोणताही व्यवहार करण्यापूर्वी SRA कडे चालू अटी तपासा. हा कायदेशीर सल्ला नाही.